गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्था राखा : पोलीस निरीक्षक ढोकणे

गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्था राखा : पोलीस निरीक्षक ढोकणे

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गणेशोत्सव काळात डीजेला बंदी कायम असून, सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणुकीत पारंपारिक वाद्याचा वापर करावा; तसेच शांतता व कायदा व्यवस्था राखावी असे आवाहन दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी केले. दिंडोरी पंचायत समिती हॉलमध्ये शांतता समितीची नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली असता त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार पंकज पवार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून दिंडोरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप, वीज वितरण कंपनीचे अधिकारी सुनील राऊत, पोलीस पाटील संघटनेचे चिंतामण पाटील, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे आधी उपस्थित होते.

बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये दि. १९ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीतील गणेशोत्सव साजरा होत आहे. गणेश उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे; कायद्याचे उल्लंघन करू नये याची संबंधित गणेश मंडळांनी काळजी घ्यावी असे आवाहन ढोकणे यांनी केले. यावेळी तहसीलदार पंकज पवार गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करून, गणेश भक्तांना शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. आभार पोलीस निरीक्षक ढोखळे यांनी मानले. कार्यक्रमा प्रसंगी दिंडोरी नगरपंचायतीचे नगरसेवक, पदाधिकारी, पोलीस पाटील व तालुक्यातील विविध मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.