खेड तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट — पोलिस प्रशासनाचे मौन संशयास्पद...

खेड तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट — पोलिस प्रशासनाचे मौन संशयास्पद...

प्रतिनिधी - विश्वनाथ केसवड, खेड

खेड तालुक्यात विविध गावांमध्ये अवैध धंदे, दारू विक्री, मटका आणि पत्त्यांचे अड्डे तसेच लॉजमधून चालणारे वेश्या व्यवसाय यांसारख्या अनैतिक व बेकायदेशीर कृत्यांना अक्षरशः ऊत आला आहे. माईराज, समर्थ, सहारा, बसेरा आणि विश्वमिलन या लॉजमध्ये कमी वयाच्या मुला-मुलींना प्रवेश देऊन अनैतिक धंदे चालवल्याची गंभीर माहिती समोर आली आहे.

या लॉजमालकांवर आणि संबंधित व्यक्तींवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

तालुक्यातील मच्छी मार्केट, पाबळ रोड, छत्रपती चौक, शिरवली, चांडवली, पडळवाडी, चास, मोखल, कडधे, डॅम परिसर, दावडी, खरपुडी आणि कडूस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारू विक्री, पत्त्यांचे क्लब व मटक्याचे अड्डे निर्भयपणे सुरू आहेत. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही पोलिस प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे आरोप नागरिक व कार्यकर्त्यांकडून होत आहेत.

यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून पोलिस प्रशासनावरील विश्वास डळमळीत होत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे, तसेच नागरिकांचे संरक्षण करण्याचे पोलिसांचे प्राथमिक कर्तव्यच धोक्यात आले आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी, खेड तालुका यांच्यावतीने सर्व अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर शांततेत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पक्षाने दिला आहे.

या आंदोलनात सुमारे ३० ते ४० कार्यकर्ते सहभागी होणार असून पोलिस प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.