कोराटे येथे बिबट्याचा तरुणावर हल्ला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण...

कोराटे येथे बिबट्याचा तरुणावर हल्ला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथे आज गुरुवार (दि.२१) रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास भानुदास वामन कदम या तरुणावर; बिबट्याने अचानक हल्ला करून जखमी केल्याने परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वीच कोराटे येथे मध्यावर असणाऱ्या वाघ नाल्यामध्ये या बिबट्यांचे वास्तव असून, या बिबट्याने दोन दिवसांपूर्वी सह्याद्री कंपनीत जाणाऱ्या तरुणावर देखील हल्ला केला होता. मात्र नागरिकांनी आरडाओरडा केल्याने या बिबट्याने धूम ठोकली. आज पुन्हा विष्णु शिंदे यांच्या शेतालगत असणाऱ्या शेतामध्ये भानुदास कदम हा सकाळी शेतात चक्कर मारत असताना; बिबट्याने पाठीमागून येऊन अचानक हल्ला केल्याने त्याच्या मानेला व खांद्याला दोन ठिकाणी पंजे मारून जखमी केले आहे. भानुदास याने आरडाओरडा केल्याने संबंधित शेतकरी शेताकडे धावल्याने येथेही बिबट्याने धूम ठोकली. त्यानंतर भानुदास याला दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सध्या कोराटे व पालखेड परिसरात हे बिबटे अनेक ठिकाणी वस्ती वाड्यांमध्ये आढळून येत असल्याने, येथील नागरिकांना शेतात जाणे देखील मुश्किल झाले आहे. गेल्या पाच ते सहा दिवसापासून नागरिकांच्या मागणीनुसार वाघनाला येथे पिंजरा लावण्यात आला आहे. परंतु अजूनही बिबट्या पिंजऱ्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आज झालेल्या हल्ल्यात सुदैवाने नागरिकांमुळे बिबट्याने पळ काढल्याने जीवितहानी टळली आहे. मात्र हे असे किती दिवस चालणार हे सांगणे कठीण झाले आहे. अधिकारी येतात पिंजरा लावतात आणि निघून जातात.! परंतु, ज्या घटना घडत आहे त्याला जबाबदार कोण? त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी यावर त्वरित उपाययोजना करून ज्या ठिकाणी या बिबट्यांचा वावर आढळून येत आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त पिंजरे लावून या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून नागरिकांकडून केली जात आहे.