नागरिकांच्या जीवापेक्षा पाकिटे महत्त्वाची झालीत का? दगड पडून जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार? अवजड वाहतुकीचा बेजबाबदार कारभार आणि रस्त्यावरील धोकादायक परिस्थितीवरून नागरिकांचा संताप
खेड | प्रतिनिधी विश्वनाथ केसवड
खेड : रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचा जीव सुरक्षित आहे की नाही, याची जबाबदारी नेमकी कोणाची? रस्त्यावरून धावणाऱ्या अवजड वाहनांमधून दगड पडण्यासारख्या धोकादायक घटना घडत असतील, तर अशा वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणा नेमके काय करत आहेत, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अवजड वाहनांमधून दगड, माती किंवा इतर साहित्य रस्त्यावर पडत असल्यास त्याचा फटका दुचाकीस्वार, चारचाकी चालक आणि पादचाऱ्यांना बसू शकतो. एखाद्या निष्पाप नागरिकाच्या अंगावर दगड पडून त्याचा जीव गेला, तर त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार? एखादा अपघात घडल्यानंतर पंचनामे, चौकशी आणि आश्वासनांचा सिलसिला सुरू होण्यापेक्षा अपघात रोखण्यासाठी आधीच ठोस कारवाई का केली जात नाही?
प्रशासनाला थेट सवाल!
- अवजड वाहनांमधून साहित्य रस्त्यावर पडू नये यासाठी तपासणी होते का?
- वाहनांमधील माल सुरक्षितपणे वाहून नेला जातो का?
- नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर प्रत्यक्ष कारवाई होते का?
- पोलीस आणि आरटीओच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांनी केलेल्या आरोपांची चौकशी होणार का?
- नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या वाहनांवर कायमस्वरूपी नियंत्रण कधी आणणार?
नागरिकांना दंड आकारण्यासाठी प्रशासन तत्पर असते; मग नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करताना ही तत्परता कुठे जाते?
आता पोलीस प्रशासन, आरटीओ आणि संबंधित यंत्रणांनी या गंभीर प्रश्नांची उत्तरे देऊन प्रत्यक्ष कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
vishwanathkeswad