दिघी पोलिसांची धडाकेबाज कारवाई! २४ तासांत घरफोडीचा छडा; १.१५ कोटींचे दागिने हस्तगत
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड दिघी,
दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत मोठी कामगिरी केली आहे. या प्रकरणात दोन विधीसंघर्षित बालकांची ओळख पटवून त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत.
दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) नुसार घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिघी परिसरातील संत गजानन महाराज नगर येथील एका निवासस्थानी अज्ञात व्यक्तींनी घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास केले होते.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील तब्बल ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि पोलिसांच्या तपासाच्या आधारे संशयित विधीसंघर्षित बालकांचा माग काढण्यात आला.
तपासात वय १६ वर्षे, रा. राजनगर, संत तुकारामनगर परिसर आणि वय १४ वर्षे, रा. राजनगर आदर्श नगर, दिघी, पुणे येथील दोन विधीसंघर्षित बालकांची ओळख पटली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे दागिने हस्तगत केले.
तब्बल १.१५ कोटींच्या बाजारभावाचा मुद्देमाल!
या कारवाईत ५७७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ६४० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू असा एकूण ₹३५ लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या मुद्देमालाची बाजारभावानुसार किंमत तब्बल ₹१ कोटी १५ लाख असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
दिघी पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी तपासामुळे घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या एका दिवसात उलगडा झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केलेल्या या कारवाईचे कौतुक होत आहे.
२४ तासांत गुन्ह्याचा छडा, ५० सीसीटीव्हींचे फुटेज तपासून संशयितांचा माग आणि कोट्यवधींच्या बाजारभावाचा मुद्देमाल हस्तगत—दिघी पोलिसांची ही कारवाई परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
vishwanathkeswad