पिंपळवंडी येथील पीडित कुटुंबाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट! फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्याचे निर्देश

पिंपळवंडी येथील पीडित कुटुंबाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट! फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्याचे निर्देश

प्रतिनिधी: विश्वनाथ केसवड जुन्नर,

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या धक्कादायक घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पिंपळवंडी येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.

या प्रकरणातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच तपासात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी पोलिसांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्याकडून तपासाची माहिती घेतली. तपास वेगाने आणि प्रभावीपणे पूर्ण करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले.

फास्ट ट्रॅक कोर्टात खटला

बालिकेच्या कुटुंबाला लवकर न्याय मिळावा आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्पष्ट केले.

कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी घरकुल

पीडित कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाच्या माध्यमातून शबरी घरकुल योजनेतून तातडीने घरकुल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच महिला व बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरातील मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि हायमास्ट दिवे बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जातीचे दाखले देण्यासाठी विशेष मोहीम

पिंपळवंडीतील संबंधित वस्तीमध्ये नागरिकांना जातीचे दाखले उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. पात्र कुटुंबांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

पीडित कुटुंबाला १५ लाखांची आर्थिक मदत

पीडित कुटुंबाला राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच महिला व बालविकास विभागाच्या मनोधैर्य योजनेतून दहा लाख रुपयांची मदत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

न्यायालयीन समितीची मंजुरी मिळाल्यानंतर दहा लाख रुपयांची रक्कम आजच पीडित कुटुंबाच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

घटना अत्यंत वेदनादायी आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल. आरोपीला कठोर शिक्षा मिळण्यासाठी तपासात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी आमदार शरद सोनवणे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, जिल्हा परिषद सदस्य छाया तांबे, कल्पना काळे, सोनाबाई दाभाडे, अमित बेनके, विकास दरेकर, देवराम लांडे, पूजा बुट्टे, सुप्रिया लेंडे, उपजिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय पाटील यांच्यासह पिंपळवंडी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.