मोठी बातमी : अजब दुकानदार, धंदा वाढविण्यासाठीची शक्कल आली अंगलट, राजगुरूनगर शहरातील अजब प्रकार समोर..!
![मोठी बातमी : अजब दुकानदार, धंदा वाढविण्यासाठीची शक्कल आली अंगलट, राजगुरूनगर शहरातील अजब प्रकार समोर..!](https://news15marathi.com/uploads/images/202501/image_750x_679676a21ca50.jpg)
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
खेड : राजगुरुनगर शहरात मार्केटिंगचा अनोखा फंडा दुकानदाराच्या अंगलट आला आहे. कारण,या फंड्यापायी दुकान बंद करण्याची वेळ दुकानदारावर आल्याचं पाहायला मिळालं. प्रजासत्ताक दिनानिमित्त एका कापड दुकानादाराने १ रुपयांमध्ये १ ड्रेस अशी खास महिलांसाठी ऑफर ठेवली होती. त्यामुळे, वाऱ्याच्या वेगाने व सोशल मीडियातून ही ऑफर घराघरात पोहचली.या ऑफरचा फायदा घेण्यासाठी महिलांची राजगुरुनगरमध्ये एकच झुंबड उडाली.
परंतु अनपेक्षित गर्दी पाहून दुकानदाराने चक्क दुकानच बंद करण्याचा निर्णय घेतला. पण, केवळ १ रुपयामध्ये कपडे न घेण्याच्या अपेक्षेने आलेल्या महिलांनी दुकान बंद होताच संताप व्यक्त केला. येथे महिलांनी दुकानासमोर तोबा गर्दी केली होती. परिणामी या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचंही पाहायला मिळालं. कारण, दुकानदाराने १ रुपयांत कपडे न दिल्यास दुकान तोडून कपडे घेणार, अशी आक्रमक भूमिका महिलांनी घेतली होती. त्यामुळे येथे पोलिसांना हस्तक्षेप करण्याची वेळ आली.
मुख्य रस्त्यावरील मोठी गर्दी आणि वाहतुकीची कोंडी झाल्याने १ रुपयांत ड्रेसच्या ऑफर्सची बातमी पोलीस स्टेशनपर्यंतही पोहोचली. अखेर घटनास्थळी खेड पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले. या कर्मचाऱ्यांनी महिला व दुकानदार यांच्यात हस्तक्षेप करत वाद संपुष्टात आणल्याची चर्चा शहरात रंगली आहे.