विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण! संतप्त पालकांचा आक्रमक पवित्रा; आरोपी शिक्षक पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड चाकण,
चाकण : महाळुंगे परिसरातील ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकाने कथितरीत्या अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यांना लाकडी काठीने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
विद्यार्थिनींनी मारहाण करू नये, अशी विनंती करूनही शिक्षकाने मारहाण केल्याचे पालकांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर संतप्त शिक्षकाने शाळेतील स्टाफ रूमच्या काचा फोडून धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. पालकांच्या तक्रारीनंतर आरोपी शिक्षक दिपज्योत दास याला दक्षिण महाळुंगे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
शाळा प्रशासनानेही घटना चुकीची असल्याचे मान्य करून संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची आणि त्याला शाळेतून काढून टाकण्याची हमी पालकांना दिल्याचे सांगण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! शिक्षकांवर कठोर कारवाई होणार का? याकडे आता पालकांचे लक्ष लागले आहे.
vishwanathkeswad