मंचर पोलीस ठाण्याकडून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना...

News15 मराठी प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड पुणे
मंचर : मंचर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जुना चांडोली रोड येथे राहणारा सराईत गुन्हेगार पवन सुधीर थोरात (वय २५ वर्षे) याला एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवाणगी करण्यात आली.
पवन थोरात याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, गर्दीमारामारी, अवैध वाळूउपसा, व अवैध शस्त्र बाळगणे यांसारखे एकूण १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही त्याच्यावर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई झाली असून, वेळोवेळी अटक व जामिनानंतरही त्याच्या वागण्यात सुधारणा झालेली नव्हती.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीच्या गुन्हेगारी वर्तनामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे त्याला कायद्याच्या चौकटीत ठेवण्यासाठी मंचर पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता.
त्यानुसार, दिनांक ९ जून २०२५ रोजी जिल्हाधिकारी पुणे यांनी पवन थोरात याच्या एक वर्षाच्या स्थानबद्धतेचे आदेश जारी केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात हलवले आहे.
गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर..
मंचर पोलिस स्टेशनच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणीही कायदा हातात घेतल्यास किंवा दहशतीचं वातावरण निर्माण केल्यास अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल
या कार्यवाहीत पो.नि. श्रीकांत कंकाळ, पो.नि. अविनाश शिळीमकर (स्थानीय गुन्हे शाखा), स.पो.नि. सुनिल बडगुजर, पो.उ.नि. यशवंत यादव, स.पो.उ.नि. राजेश नलावडे, तसेच अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली.