सुनेत्राताई अजित पवारांकडून आरोग्य विभागाला निर्देश; चाकण, महाळुंगे, आंबेठाणसह खेड तालुक्यासाठी मोठे निर्णय

सुनेत्राताई अजित पवारांकडून आरोग्य विभागाला निर्देश; चाकण, महाळुंगे, आंबेठाणसह खेड तालुक्यासाठी मोठे निर्णय

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड खेड,

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांनी आरोग्य विभागाशी संवाद साधून पुणे जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत महत्त्वपूर्ण निर्देश दिले. दुर्गम, आदिवासी तसेच औद्योगिक भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रलंबित प्रस्तावांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

राजगड (वेल्हे) येथील नवीन ग्रामीण रुग्णालयासाठी इमारत व आवश्यक पदे मंजूर करणे, चाकण उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण करून आवश्यक पदनिर्मिती करणे, तसेच महाळुंगे (ता. खेड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एमआयडीसीची जागा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. आंबेठाण येथे आरोग्य उपकेंद्रास मंजुरी देण्याबाबतही तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

खेड तालुक्यातील दुर्गम आणि आदिवासी भागात नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्याबरोबरच खेड-राजगुरुनगर ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याच्या प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. बांधकाम पूर्ण झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी पदनिर्मितीची प्रक्रिया पूर्ण करण्यावरही भर देण्यात आला.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील बालकांच्या जन्मनोंदणीमध्ये येणारे अडथळे तातडीने दूर करावेत, तसेच ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक जागा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या.

खेड तालुक्यातील पाईट येथे दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांसाठी १०८ रुग्णवाहिका २४ तास उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

आरोग्य सुविधांशी संबंधित निर्णय केवळ कागदोपत्री न राहता त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना मिळाला पाहिजे. प्रलंबित प्रस्तावांचा कालबद्ध पद्धतीने निपटारा करून नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने आणि तत्परतेने काम करावे, असे निर्देश सुनेत्राताई अजित पवार यांनी दिले.