चिंचवड विधानसभा पोट निवडणूक नामनिर्देशनपत्र भरण्याबाबत उमेदवारांना सुचना.! व नियमावली जाहीर...

चिंचवड विधानसभा पोट निवडणूक नामनिर्देशनपत्र भरण्याबाबत उमेदवारांना सुचना.! व  नियमावली जाहीर...

NEWS15 प्रतिनिधी : गणेश मोरे 

पिंपरी - चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मंगळवार दि. 31 जानेवारी 2023 ते मंगळवार दि.7 फेब्रुवारी 2023 या कालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी 3.00

वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) नामनिर्देशन पत्र क्षेत्रीय अधिकारी यांचा कक्ष, 3 रा मजला , ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिकाथेरगावपुणे - 411033 येथे दाखल करता येईल. त्यापूर्वी व त्यानंतर नामनिर्देशनपत्र स्विकारले जाणार नाहीत. तसेच निवडणुक निर्णय अधिकारी अथवा प्राधिकृत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेद्वारेच नामनिर्देशनपत्र स्विकारले जातील. अन्य कोणीही स्वीकारु शकणार नाही.

सदर नामनिर्देशन पत्र हे नमुना 2 ब मध्ये दाखल करावे, त्यासोबत नमुना 26 मधील प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे. नामनिर्देशनपत्राचा नमुना 2 ब हा नामनिर्देशनपत्र दाखल करावयाच्या कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. उमेदवार स्वत: अथवा उमेदवराचा सुचक असे नामनिर्देशन पत्र दाखल करु शकेल. एका उमेदवारास जास्तीत जास्त 4 नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 173 (अ) अन्वये शपथ उमेदवाराने स्वत: निवडणूक निर्णय अधिकारी / प्राधिकृत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे समक्ष छाननीपुर्वी घेणे आवश्यक आहे.

उमेदवार अन्य मतदारसंघातील मतदार असल्यास मतदार नोंदणी अधिकारी / सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचा दाखला छाननीपूर्वी दाखल करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्ष व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्ष यांचे उमेदवारांना एक सूचक व इतर उमेदवारांना 10 सूचक याच मतदारसंघातील असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा मुळ A B फॉर्म हा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या मुदतीपूर्वी दाखल करणे बंधनकारक आहे. उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातील असल्यास रु. 10000/- (दहा हजार) व अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील उमेदवारांना रु. 5000/- (पाच हजार) रोख स्वरुपात निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाकडे अथवा कोषागारामध्ये भरुन त्याची पावती नामनिर्देशन पत्रासोबत जोडावी लागेल.

नामनिर्देशन पत्रासोबत उमेदवारांनी त्यांचे बँक खात्याच्या तपशील देणे बंधनकारक आहे. सदरचे बँक खाते हे राष्ट्रीयकृत बँक / को-ऑपरेटिव्ह बँक / पोष्ट ऑफीस येथे नामनिर्देशन दाखल करण्यापूर्वीच्या किमान एक दिवस अगोदर सुरु केलेले असणे आवश्यक आहे. तसेच रक्कम रु. 20000/- वरील सर्व खर्च हा या खात्यातुन ऑनलाईन अथवा क्रॉस चेकच्या माध्यमातुन व्यवहाराद्वारे केलेला असावा. त्यापेक्षा कमी रक्कम रोखीने दिल्यास चालेल. परंतु सर्व व्यवहार या खात्यातूनच करणे बंधनकारक असेल. बँक खाते स्वतंत्ररित्या न उघडल्यास अथवा त्याची माहिती न दिल्यास अथवा त्या व्यतिरिक्त अन्य स्त्रोतामधुन खर्च / जमा केल्यास उमेदवारावर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील तरतुदींनुसार अपात्रतेची कार्यवाही होऊ शकेल. उमेदवार / प्रतिनिधी यांनी नामनिर्देशन पत्रासोबत / छाननीपूर्वी फोटो देणे आवश्यक आहे. सदरचा फोटो हा नजीकच्या 3 महिन्याचे कालावधीतील असावा. सदरचा फोटो 2 से.मी. ते 2.50 से.मी. असावा. सदरचा फोटो हा शुभ्र रंगाचा पार्श्वभूमीवर उमेदवाराचा पूर्ण चेहरा दिसेल अशा पध्दतीने असावा. उमेदवारांनी फोटो न दिल्यास नामनिर्देशन पत्र अवैध होणार नाही. परंतु मतपत्रिकेवर उमेदवाराचा फोटो येणार नाही. उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रासोबत सुधारीत नमुना 26 मधील प्रतिज्ञापत्र जोडणे आवशयक आहे. सदर प्रतिज्ञापत्रामधील सर्व माहिती भरणे आवश्यक आहे. सदरचे प्रतिज्ञापत्र हे नोटरी / प्रथम वर्ग दंडाधिकारी यांचेसमोर रुपये 100/- स्टॅम्प पेपरवर करणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्राच्या प्रत्येक पानावर उमेदवार / उमेदवाराचा प्राधिकृत प्रतिनिधी यांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.

 उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांची संपत्ती मत्ता (चल व अचल संपती इ.), दायित्व , शैक्षणिक आणि गुन्हेगारीविषयी पार्श्वभूमी याची माहिती देणे आवश्यक आहे. उमेदवारांवरील दाखल गुन्ह्यांची माहिती उमेदवार, राजकीय पक्ष व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वृत्तपत्र, टी.व्ही. चॅनल यामध्ये प्रसिध्द करणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी गुन्हेगारीविषयी माहिती त्यांच्या पक्षाला कळविले आहे असे घोषणापत्र प्रतिज्ञापत्र नमुना 26 मध्ये करणे आवश्यक आहे. तसेच भारत निवडणुक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या निर्देश व सूचनांचे पालन उमेदवारांनी करणे आवश्यक आहे.