वादळी वाऱ्याने आनंदवाडी येथील शाळेच्या सहा खोल्यांवरील पत्रे अँगलसह गेली उडून.! संगणक, कागदपत्रांसह इतर साहित्यांचे नुकसान

वादळी वाऱ्याने आनंदवाडी येथील शाळेच्या सहा खोल्यांवरील पत्रे अँगलसह गेली उडून.! संगणक, कागदपत्रांसह इतर साहित्यांचे नुकसान

प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, शिरूर अनंतपाळ (लातूर )

वादळी वाऱ्याने लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी येथील एका शाळेच्या सहा खोल्यांवरील पत्रे अँगलसह उडून गेली आहेत. तर यात संगणक आणि कागदपत्रांसह इतर साहित्यांचे नुकसान झाले.

लातूर जिल्ह्यातील काही भागात दि. 20 मार्च'च्या सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. कालच्या वादळी वाऱ्यात जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ शहराजवळील आनंदवाडी येथील एका शाळेच्या सहा खोल्यांवरील पत्रे अँगलसह उडून गेल्याची घटना घडलीय. संस्कार वर्धिनी पार्वतीबाई वंगे विद्यालयात ही घटना घडली असून, वादळी वाऱ्यात अँगलसह पत्रे उडून शाळेतील ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, महिला कक्ष आणि क्रीडा साहित्याच्या कक्षातील काचेचे साहित्य, प्रयोगशाळेतील साहित्य, संगणक यासह शैक्षणिक कागदपत्रांचे मोठे नुकसान झाले आहे.

शिक्षण विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेची माहिती कळाल्यानंतर घटनास्थळी आज सकाळी गटविकास अधिकारी बी. टी. चव्हाण यांनी भेट दिली. तर ग्रामसेवकांंनी पंचनामा केला.