क्राईम: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपूडी गावात सैराट चित्रपटाची आठवणीना उजाळा देणारी घटना समोर...!

क्राईम: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपूडी गावात सैराट चित्रपटाची आठवणीना उजाळा देणारी घटना समोर...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

खेड : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सैराट चित्रपटातील प्रसंग आठवण करून देणारा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात खरपुडी गावात राहणाऱ्या आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यावर हल्ला करून तरुणीचे तिच्या नातेवाईकांकडूनचं अपहरण करण्यात आले आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एकूण १५ जणांविरोधात गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल केले आहेत. यामध्ये संबंधित विवाहित तरुणीचा भाऊ, आई आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे.

पुण्यातील खेड येथील खरपुडी गावात राहणारे विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता गोसावी (वय २८) या दाम्पत्याने समाजातील विरोधाला न जुमानता जाती पातीच्या पलीकडे जाऊन प्रेमविवाह केला होता. दोघेही काही काळापासून खरपूडी गावातचं स्थायिक झाले होते. मात्र त्यांच्या या नात्याला तरुणी प्राजक्ताच्या नातेवाईकांनी कडाडून विरोध केला होता. रविवारी ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी, प्राजक्ताचे कुटुंबीय गावात आले. त्यांनी आधी प्राजक्ताचा पती विश्वनाथवर हल्ला करत त्याला बेदम मारहाण केली आणि नंतर प्राजक्ताचे अपहरण करत तिला बळजबरीने घेऊन गेले. या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अपहरण, मारहाण व बळजबरी केल्याच्या आरोपाखाली १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला असून प्राजक्ताचा ठावठिकाणा शोधण्यासाठी वेगाने चक्रे फिरवली आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून संपूर्ण प्रकरण गंभीर असून सामाजिक सौहार्द बिघडू नये म्हणून आम्ही गांभीर्याने तपास करत आहोत. आरोपी लवकरच आमच्या ताब्यात असतील असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

खरंच जातीये बंधने तुटली आहेत का?

घडलेली घटना केवळ एका प्रेमविवाहाचा प्रश्न नसून, समाजातील जातीय तेढ आणि जुनाट मानसिकतेचे दर्शन घडवणारी आहे. प्राजक्ताला जबरदस्तीने पळवून नेल्याची बाब तिच्या इच्छेविरुद्ध असल्याचे संकेत प्रथमदर्शी मिळत असून यामुळे कायद्यानेदेखील हा गंभीर गुन्हा ठरतो. प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांनी खरपुडी गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामस्थांनाही शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांच्याकडुन करण्यात आले आहे.