राजकीय आखाडा : खेड तालुक्यातील महाळुंगे जिल्हा परिषद गटातून माजी सदस्य विरुद्ध नवखा उमेदवार आव्हान देणार? शेखर तुपे उबाठा गटाकडून इच्छुक?
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
खेड : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात प्रारूप गट रचना जाहीर होताच अनेक इच्छुकांनी आपल्या आपल्यापरीने राजकीय मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच यावेळी महाळुंगे जिल्हा परिषद गटाची रचना धक्कादायक झाल्याने अनेक इच्छुकांची गोची तर काही इच्छुकांना लॉटरी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महाळुंगे जिल्हा परिषदेच्या प्रारूप गट रचणेनुसार या गटातून प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील-भाजपा, अतुल देशमुख सध्या श.प.राष्ट्रवादीत असले तरी ऐनवेळी त्यांना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीची उमेदवारी करावी लागू शकते असाही राजकीय जाणकार कयास बांधत आहेत. त्यानंतर उबाठा शिवसेनेकडून जवळपास आरक्षित जागा सर्वसामान्य प्रवर्गाला आली तर महाळुंगे इंगळे गावचे माजी सरपंच शेखर तुपे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आल्याची चर्चा रंगू लागली आहे. जर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीची उमेदवारी अतुल देशमुख यांना मिळाली तर, गणेश बोत्रे यांना भविष्यातील वेगळा राजकीय मार्ग शोधावा लागू शकतो किंवा ते आपले राजकीय नशीब आजमावण्यासाठी अपक्ष म्हणूनही निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात.
महाळुंगे जिल्हा परिषद गटाची सगळी राजकीय गोळा बेरीज बघता शेखर तुपे हे या अगोदरही नवखे असूनही खेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यात त्यांना अपयश आले तरी, त्यांचा या जिल्हा परिषद गटातील जनसंपर्क बघता आणि नातेसंबंध बघता ते वरील उमेदवारांना तगडी टक्कर देऊ शकतात. त्यात गावातील राजकीय समीकरणे त्यांना जुळविण्यास सध्या तरी मोठी अडचण वाटत नाही. त्यामुळे महाळुंगे जिल्हा परिषद गटाची प्रारूप झालेली रचना बघता आणि राजकीय,सामाजिक व नातेसंबंध बघता आणि मोठ्या मताधिक्याचे महाळुंगे गाव बघता शेखर तुपे वरील उमेदवार यांच्या समोर मोठे आव्हान उभे करू शकतात. त्यांनी जिल्हा परिषदेची प्रारूप गट रचना जाहीर होताच जिल्हा परिषद निवडणुकीच्या आखाड्यात मीही असल्याचे सुतोवाच केले आहे.
महाळुंगे गटाच्या बाबत काही उमेदवारांचे राजकीय अस्थित्व धोक्यात आल्याने त्यांनी आता त्यात कसा बदल करता येईल या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांनी राजकीय अस्त नको म्हणून काही गावांतील आपल्या समर्थकाना एकत्र करून आपल्या गावावर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली आहे. त्यातच काहींनी गट रचना बघून आता नको पुढे पाहू अशीही राजकीय भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता इच्छुकांच्या यादीत युवा चेहरा शेखर तुपे यांनी रणशिंग फुंकले आहे. पण नक्की कुणाला कुठे आरक्षणानंतर संधी भेटते आणि गट रचना कशी होते यानंतरच या गटाचे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. तो पर्यंत सगळे वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे दिसून येते..
भाग -१