कुंडमळा दुर्घटनेवर राज ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया.! पूल धोकादायक होता मग पूर्ण प्रवेशबंदी का नाही?
प्रतिनिधी - मावळ (पुणे)
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून रविवारी (दि. १५ जून) रोजी झालेल्या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला. तर एकूण 51 जण जखमी झाले आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच झालेल्या या भीषण दुर्घटनेने मावळ तालुका हादरलाय.
दरम्यान रविवारी रात्री उशीरापर्यंत याठिकाणी बचावकार्य व शोधकार्य सुरू होते.
याबद्दल राज्यासह देशभरातील अनेक नेते मडळींनी प्रतिक्रिया देत घटनेबद्दल दुख व्यक्त केले. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहून या दुर्घटनेबद्दल आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली असून शासन आणि प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
काय म्हणाले राज ठाकरे? ('एक्स' पोस्टनुसार)
"काल मावळ तालुक्यातील कुडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत आणि काही जणं मृत्युमुखी पडलेत. नक्की हानी किती झाली आहे याचा अंदाज आला नाहीये. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकाना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.
हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला? प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की, 'बचावकार्य वेगाने सुरु आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे..'
पण लोकांनी देखील उत्साहाला थोडा आवर घालायला हवा. अशा धोकादायक ठिकाणी जाताना, आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवं. अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असं नाही. पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क रहायला हवं.
आत्ता कुठे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे तर राज्यातल्या बऱ्याच शहरांत पाणी साठणं, रस्त्यांची चाळण होणं, पूल पाडणं अशा घटना सुरु झाल्यात. या सगळ्यात सरकारने आतातरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पहावं.
असं राज ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे आपला संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.