पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४७ वर्षीय महिलेचे अपहरण; माजी सभापतीसह तिघांविरोधात गुन्हा

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४७ वर्षीय महिलेचे अपहरण; माजी सभापतीसह तिघांविरोधात गुन्हा

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड खेड,

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) निवडणुकीची राजकीय चर्चा रंगात असतानाच खेड तालुक्यात एका ४७ वर्षीय महिलेच्या कथित अपहरणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी खेड पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश लक्ष्मण शिंदे यांच्यासह तिघांविरोधात खेड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने सहकार आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास खेड पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे , लक्ष्मण धोंडू शिंदे आणि मंगल लक्ष्मण शिंदे हे तिघे स्थानिक रहिवासी अतुल शिंदे यांच्या घरी पोहोचले होते.

जिल्हा बँकेच्या प्रतिनिधी निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची चर्चा करायची असल्याचे सांगत त्यांनी अतुल शिंदे यांची आई पुष्पा दत्तात्रय शिंदे (वय ४७) यांना सोबत खेड येथे येण्याचा आग्रह धरल्याचा आरोप आहे.

पुष्पा शिंदे यांना MH 14 HK 6606 क्रमांकाच्या हुंडाई क्रेटा गाडीतून नेण्यात आले. मात्र, संध्याकाळ उलटून गेल्यानंतरही त्या घरी परतल्या नाहीत. कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल फोनही बंद असल्याचे सांगण्यात आले.

कुटुंबीयांनी विविध ठिकाणी शोध घेतल्यानंतरही त्या सापडल्या नाहीत. अखेर तीन दिवस उलटल्यानंतरही पुष्पा शिंदे यांचा ठावठिकाणा न लागल्याने कुटुंबीयांनी थेट खेड पोलिसांत धाव घेतली.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे

सुरेश लक्ष्मण शिंदे – माजी सभापती, खेड पंचायत समिती (रा. आंबोली)

लक्ष्मण धोंडू शिंदे – रा. आंबोली मंगल लक्ष्मण शिंदे – रा. आंबोली

अतुल शिंदे यांच्या तक्रारीवरून खेड पोलिसांनी सुरेश शिंदे यांच्यासह तिघांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, पुष्पा शिंदे यांचा शोध आणि पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.