संघर्षावर मात करत शेतकरी पुत्र योगेश गारगोटे PSI पदावर विराजमान...
प्रतिनिधी :-विश्वनाथ केसवड, खेड
खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक या छोट्याशा गावातून एक प्रेरणादायी यशोगाथा समोर आली आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सुपुत्र योगेश गारगोटे यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मोठे यश संपादन केले आहे.
सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असताना त्यांच्या आयुष्यात एक कठीण प्रसंग आला. वडिलांचे अकाली निधन झाले, ज्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र या संकटासमोर न खचता योगेश यांनी धैर्याने परिस्थितीचा सामना केला.
दुःख मनात ठेवून त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. कठोर परिश्रम आणि अथक जिद्दीच्या बळावर त्यांनी आपले स्वप्न साकार केले. आज ते पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड होऊन वाकी बुद्रुक गावाचा अभिमान ठरले आहेत.
त्यांचा साधा, गोड स्वभाव, माणुसकीची जाणीव आणि संघर्षातून घडलेली ताकद हीच त्यांची खरी ओळख आहे.
जिद्ध असेल तर रस्ता सापडतो, आणि स्वप्न असेल तर यश नक्की मिळते; योगेश गारगोटे यांची ही प्रेरणादायी कहाणी ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणासाठी मार्गदर्शक ठरत आहे.