अड्याळ तलाठी कार्यालयाचा 'अंधार' कायम.! १२ हजारांसाठी वीज कापली...
प्रतिनिधी - नितीन वरगंटीवार, भंडारा
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अड्याळ येथील पटवारी भवन (तलाठी कार्यालय) मागील दोन आठवड्यांपासून अंधारात आहे. तब्बल १२,८३० रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने; महावितरणने २७ जानेवारी रोजी या कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
विशेष म्हणजे.! ६ महिन्यांतील वीज गुल होण्याची ही दुसरी वेळ असून, याकडे लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूर्णपणे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
अड्याळ हे परिसरातील मध्यवर्ती केंद्र असल्याने येथे दररोज शेकडो शेतकरी सातबारा, फेरफार आणि विविध दाखल्यांसाठी येत असतात. तसेच विद्यार्थी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या कामासाठी चकरा मारत आहेत. मात्र, कार्यालयात वीज नसल्यामुळे संगणकीय प्रणाली ठप्प झाली असून, हाताशी आलेली कामे रखडली आहेत.
"महिनोंमहिने बिल का भरले जात नाही?" असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. एका बाजूला सरकार 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, दुसऱ्या बाजूला मोठ्या गावच्या तलाठी कार्यालयाचे बिल भरण्यासाठी निधी नसावा, ही खेदाची बाब असल्याचे स्थानिकांनी बोलून दाखवले.
गावातील राजकीय नेते आणि तहसील विभागातील वरिष्ठ अधिकारी या गंभीर विषयाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप होत आहे. वीज कापल्यामुळे केवळ कर्मचारीच नव्हे, तर कामासाठी येणाऱ्या जनतेला तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. वारंवार वीज कापली जात असल्याने या कार्यालयासाठी कायमस्वरूपी निधीची तरतूद का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आता या प्रकरणात वरिष्ठ प्रशासन तातडीने हस्तक्षेप करून थकीत बिल भरून वीजपुरवठा सुरळीत करणार की अड्याळचे पटवारी भवन कायमचेच अंधारात राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.