कंपन्यांच्या बसमुळे औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी; उपाययोजनेची मागणी

कंपन्यांच्या बसमुळे औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी; उपाययोजनेची मागणी

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड पिंपरी -चिंचवड,

पिंपरी-चिंचवड : देहू-आळंदी रस्ता, मोशी, चाकण-आळंदी मार्ग, निघोजे, कुरुळी तसेच एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांवर दररोज शेकडो कंपन्यांच्या बस रस्त्याच्या कडेला उभ्या राहत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस उपायुक्त श्री. विक्रांत देशमुख यांना निवेदन देऊन कंपन्यांच्या बस पार्किंगसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

अनेक कंपन्यांकडे कर्मचारी बस पार्क करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने बस कंपनीच्या बाहेर किंवा रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या जातात. त्यामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात जागा व्यापली जाते आणि विशेषतः सकाळी व सायंकाळी कामगारांच्या ये-जा वेळेत वाहतूक कोंडी आणखी वाढते.

औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक लक्षात घेता कंपन्यांनी त्यांच्या बससाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करणे आवश्यक आहे. तसेच रस्त्यांवर अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या बसवर कारवाई करून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाने प्रभावी नियोजन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.