आरटीओ फिटनेस प्रमाणपत्र घोटाळ्याचा धक्कादायक प्रकार; राज्यातील ९ प्रमुख कार्यालये चौकशीच्या रडारवर
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड पिंपरी -चिंचवड,
महाराष्ट्रातील आरटीओ कार्यालयांमध्ये वाहनांच्या ‘फिटनेस प्रमाणपत्रां’मध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूरसह राज्यातील ९ प्रमुख आरटीओ कार्यालये तपास यंत्रणेच्या रडारवर आली आहेत.
मार्च २०२६ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या विशेष समितीच्या अहवालानुसार, वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः अनिवार्य १५ दिवसांची मुदत ओलांडून तसेच मूळ प्राधिकरणाची आवश्यक परवानगी न घेता ‘फॉर्म ३८’ अंतर्गत फिटनेस प्रमाणपत्रे देण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
वाहनांची प्रत्यक्ष तपासणी, फिटनेसची प्रक्रिया आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी यामध्ये नियमांचे पालन झाले का, याबाबत आता चौकशी केली जात आहे. त्यामुळे संबंधित आरटीओ कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणामुळे वाहनांच्या सुरक्षिततेशी संबंधित फिटनेस प्रमाणपत्रांमध्येच जर गैरप्रकार होत असतील, तर रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेचे काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, चौकशीअंती नेमका गैरव्यवहार किती मोठ्या प्रमाणात झाला, कोणाची जबाबदारी निश्चित होते आणि संबंधितांवर कोणती कारवाई केली जाते, याकडे आता वाहनधारकांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.
vishwanathkeswad