महावितरणच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकांना; महाळुंगे-बिरदवडी रस्ता चिखलात
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड चाकण,
महाळुंगे : महावितरणच्या कामाच्या नावाखाली रस्ता खोदायचा आणि काम झाल्यानंतर रस्त्याकडे ढुंकूनही पाहायचे नाही, असा प्रकार महाळुंगे–दवणेमळा–आरुवस्ती–बिरदवडी मार्गावर पाहायला मिळत आहे. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे या रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली असून, त्याचा थेट फटका स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना बसत आहे.
महावितरणच्या कामासाठी रस्ता खोदण्यात आला. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेला रस्ता पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित विभागाने गांभीर्याने घेतली नसल्याचे चित्र आहे. परिणामी रस्त्यावर मोठमोठे खड्डे, माती आणि चिखल निर्माण झाला आहे.
पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
काम महावितरणचे, त्रास मात्र नागरिकांना !
महावितरणच्या कोणत्याही कामाला नागरिकांचा विरोध नाही. मात्र रस्ता खोदायचा, काम उरकायचे आणि नागरिकांना खड्डे-चिखलाच्या रस्त्यावर सोडायचे, ही कार्यपद्धती कितपत योग्य? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महावितरणच्या कामामुळे सार्वजनिक रस्त्याची झालेली दुरवस्था तातडीने दूर करणे ही संबंधित विभागाची जबाबदारी आहे. मात्र नागरिकांच्या वारंवार होणाऱ्या गैरसोयींकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
महावितरणने तातडीने रस्त्याची पाहणी करून खोदकाम केलेला संपूर्ण भाग दर्जेदार पद्धतीने पूर्ववत करावा, खड्डे बुजवावेत आणि नागरिकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, असा इशारा स्थानिकांकडून देण्यात आला आहे.
vishwanathkeswad