मरकळमध्ये ग्राममहसूल अधिकाऱ्याला मारहाण! जातीवाचक शिवीगाळ अन् गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड आळंदी,
मरकळ, ता. खेड : फेरफार नोंद करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात ग्राममहसूल अधिकाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा गंभीर प्रकार मरकळ ग्रामपंचायत कार्यालयात घडल्याचा आरोप आहे. शासकीय काम सुरू असताना अधिकाऱ्याला जातीवाचक अपशब्द वापरून मारहाण, शर्ट फाडणे आणि गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी ग्राममहसूल अधिकारी बाळासाहेब राजाराम जाधव (वय ५५) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून प्रशांत देविदास लोखंडे, रा. मरकळ, यांच्याविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, मरकळ येथील फेरफार नोंदीसंदर्भातील प्रांत अधिकाऱ्यांचा आदेश सोन्या लोखंडे यांनी जाधव यांच्याकडे आणला होता. मात्र, आदेशातील नावामध्ये चूक असल्याने नाव दुरुस्त करून आणण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी दुरुस्ती केलेला आदेश घेऊन सोन्या लोखंडे आणि त्यांच्यासोबत एक वकील जाधव यांच्याकडे आले होते.
दरम्यान, सध्या दुष्काळी पंचनाम्यांचे काम सुरू असल्याने संबंधित फेरफार नोंद एक-दोन दिवसांत घेण्यात येईल, असे जाधव यांनी सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर दुपारच्या सुमारास जाधव हे मरकळ ग्रामपंचायत कार्यालयात दुष्काळी पंचनाम्यांची यादी तयार करण्याचे शासकीय काम करत होते. त्यावेळी सोन्या लोखंडे आणि प्रशांत लोखंडे कार्यालयात आले. फेरफार नोंद अद्याप का केली नाही, असा जाब विचारत प्रशांत लोखंडे यांनी आरेरावीची भाषा केल्याचा आरोप आहे.
शासकीय कार्यालयातच मारहाणीचा आरोप
त्यानंतर वाद वाढला आणि प्रशांत लोखंडे यांनी जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप ग्राममहसूल अधिकारी जाधव यांनी केला आहे. गचुंडी पकडून शर्ट फाडला तसेच गळा दाबण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
या झटापटीत जाधव यांच्या नाकाला आणि डोक्याला मार लागून रक्तस्राव झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. घटनेनंतर त्यांना आळंदी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.
इतर कर्मचाऱ्यांसमोर प्रकार घडल्याचा दावा
घटनेच्या वेळी बालाजी जंगले, सुरेश ढगे, निलेश वर्पे, मंगेश सपकाळ, ग्रामसेवक शेवाळे यांच्यासह इतर शेतकरी आणि कर्मचारी उपस्थित असल्याचे जबाबात नमूद आहे. प्रशांत लोखंडे यांनी बालाजी जंगले यांनाही शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. उपस्थितांनी प्रशांत लोखंडे यांना मागे ओढण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी त्यांचेही ऐकले नसल्याचे जाधव यांनी सांगितले.
घटनेनंतर जाधव यांनी आळंदी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. दुखापतीमुळे पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी मेमो दिल्यानंतर आळंदी ग्रामीण रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली.
शासकीय कार्यालयात शासकीय काम सुरू असताना ग्राममहसूल अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या आरोपामुळे या घटनेची गंभीर दखल घेतली जाणार का, तसेच आरोपीविरोधात कोणती कायदेशीर कारवाई केली जाते, याकडे आता मरकळसह खेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.
vishwanathkeswad