पोलिस उपनिरीक्षकाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या; विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील PSI निलेश पाटील यांचा मृत्यू

पोलिस उपनिरीक्षकाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या; विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील PSI निलेश पाटील यांचा मृत्यू

प्रतिनिधी विश्वनाथ केसवड विश्रांतवाडी,

 विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक निलेश भाऊसाहेब पाटील यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

प्राथमिक माहितीनुसार, ही घटना नगरस रोड, औंध परिसरात घडली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली.

निलेश पाटील यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यांच्या आत्महत्येमागील कारणांचा पोलीस तपास करत आहेत.

घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि इतर बाबींची तपासणी करण्यात येत असून, तपासानंतरच या घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

पोलिस उपनिरीक्षकाच्या मृत्यूच्या या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.