पिंपळवंडीतील चिमुकलीच्या हत्या प्रकरणी संताप; आरोपीला फाशी द्या, उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा

पिंपळवंडीतील चिमुकलीच्या हत्या प्रकरणी संताप; आरोपीला फाशी द्या, उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड जुन्नर,

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडितेला तातडीने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागणीसाठी भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. रोहिदास सुभाष भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, पिंपळवंडी गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, अशा अमानुष कृत्य करणाऱ्या आरोपीला कोणतीही दया न दाखवता कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.

या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच सरकारने ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे आणि तपास व न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, अशी मागणीही करण्यात आली.

या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा होऊन भविष्यात अशा घटना घडण्यास आळा बसावा, यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.