चाकणकरांच्या माथी पुन्हा टोईंग व्हॅन; पार्किंगची व्यवस्था नाही, मात्र कारवाईचा धडाका!

चाकणकरांच्या माथी पुन्हा टोईंग व्हॅन; पार्किंगची व्यवस्था नाही, मात्र कारवाईचा धडाका!

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड चाकण,

चाकण : चाकण शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना आता पुन्हा टोईंग व्हॅनची एन्ट्री होणार असल्याने वाहनचालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. एकीकडे शहरात पुरेशा पार्किंगची सुविधा नाही, रस्त्यांवर अतिक्रमण व बेशिस्त पार्किंगचा प्रश्न कायम आहे; मात्र कारवाईच्या नावाखाली सर्वसामान्य वाहनचालकांनाच लक्ष्य केले जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

चाकण शहर तसेच परिसरात औद्योगिक वसाहतींमुळे वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यातच रस्त्यांवरील अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग, मालवाहू वाहनांची वर्दळ आणि वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे नागरिकांना रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

पार्किंगची जागा कुठे? वाहतूक नियोजन कुठे? आणि मग टोईंग कारवाई कशासाठी? असा थेट सवाल आता चाकणकरांकडून प्रशासनाला विचारला जात आहे.

टोईंग व्हॅनच्या माध्यमातून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असेल, तर तो स्वागतार्ह आहे. मात्र कारवाई करताना दुचाकी, चारचाकी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी पार्किंगची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

विशेष म्हणजे, चाकणमधील वाहतूक कोंडीचा मूळ प्रश्न सोडवण्याऐवजी केवळ टोईंग करून वाहन उचलणे हा कायमस्वरूपी उपाय ठरणार का? टोईंग व्हॅन धावणार; पण चाकणची वाहतूक कोंडी कधी सुटणार? हा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.