अड्याळ पोलिसांचा धडाकेबाज पाठलाग; १४ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त...

अड्याळ पोलिसांचा धडाकेबाज पाठलाग; १४ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त...

प्रतिनिधी - नितीन वरगंटीवार, भंडारा

अड्याळ पोलिसांनी अवैध सुगंधित तंबाखू तस्करीवर जोरदार घाव घालत धडाकेबाज कारवाई केली आहे. पोलिसांच्या सिनेस्टाईल पाठलागानंतर तब्बल १४ लाख १३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तस्कर चालक अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे.

४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी किटाळी फाटा येथे नाकाबंदी दरम्यान संशयास्पद चारचाकी ‘फोर्स वन’ (MH 02 CL 8078)या वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांचा इशारा धुडकावून लावत चालकाने वाहन भरधाव वेगात पळवले. त्यानंतर पोलिसांनीही लगेचच पाठलाग सुरू करत चित्रपटालाही लाजवेल असा थरार उभा केला.

अखेर सुमारे ५०० मीटर अंतरावर चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला सोडून दिले आणि चावी घेऊन जंगलाच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, मात्र अंधारामुळे तो हातातून निसटला.

वाहनाची झडती घेतली असता, पिवळ्या-पांढऱ्या गोण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. चावी नसल्याने पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने वाहन पोलीस ठाण्यात आणून ताब्यात घेतले.

६ एप्रिल रोजी पंचांसमोर मालाची मोजणी करण्यात आली असता, एकूण १४ लाख १३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. सपोनि धनंजय पाटील यांच्या तक्रारीवरून फरार चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या धाडसी कारवाईमुळे परिसरातील तंबाखू तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांकडून फरार आरोपीचा कसून शोध सुरू आहे.