पाण्यासाठी महिला रणरागिणींचा एल्गार! अड्याळ ग्रामपंचायतीवर ‘घागर मोर्चा’; १५ वर्षांचा पाणीप्रश्न ऐरणीवर...
अड्याळ (ता. पवनी, जि. भंडारा)
– गेल्या १५ वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती करणाऱ्या वृंदावन लेआउटमधील महिलांचा संताप अखेर उफाळून आला. रिकाम्या घागरी हातात घेत महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत जोरदार ‘घागर मोर्चा’ काढला. अचानक उसळलेल्या या आंदोलनाने प्रशासनाची झोप उडाली असून, तालुक्यात या प्रश्नाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
वृंदावन लेआउटची निर्मिती होऊन दीड दशक उलटले, तरी येथे ना नाली, ना रस्ता, ना पिण्याच्या पाण्याची सुविधा. मूलभूत सोयींचा पत्ताच नसताना लेआउटला परवानगी कशी मिळाली? असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत. मोजक्या घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना गेली अनेक वर्षे पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत असल्याचा आरोप आहे.
दिपाली किशोर भिवगडे, हेमलता ईश्वर भिवगडे, शोभा बीसन देशमुख, अशोक जागेश्वर देशमुख यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर ठिय्या आंदोलन छेडले. “लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय येथून हलणार नाही,” अशी आक्रमक भूमिका महिलांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
आंदोलनाची धार वाढताच सरपंच शिवशंकर मुंगटे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. “येत्या एक महिन्यात लेआउटमध्ये पाणीपुरवठ्याची व्यवस्था करू,” असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
मात्र, महिन्याभरात आश्वासन पूर्ण झाले नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. अड्याळमधील पाणीप्रश्नावर आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.