भेसळखोरांविरोधात तक्रार करा; नाव गुप्त ठेवण्याची हमी – तुकाराम मुंडे
राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात तक्रारी नोंदविण्याचे आवाहन केले आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नागरिकांना निर्भयपणे पुढे येण्याचे आवाहन करताना तक्रारदाराचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल, असे स्पष्ट केले आहे.
राज्यातील कोणत्याही हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाई दुकान, खाद्यपदार्थ विक्रेता किंवा इतर आस्थापनांकडून निकृष्ट दर्जाचे अथवा भेसळयुक्त अन्नपदार्थ विकले जात असल्याची शंका असल्यास नागरिकांनी त्वरित अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधावा.
यासाठी विभागाने टोल फ्री क्रमांक 1800 222 365 तसेच ई-मेल : jc-foodhq@gov.in जारी केला आहे. तक्रार करताना संबंधित आस्थापनेचा अचूक पत्ता, भेसळ होत असल्याचा संशय असलेल्या अन्नपदार्थाचे नाव आणि शक्य असल्यास इतर माहिती नमूद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सहभागामुळे भेसळखोरांवर प्रभावी कारवाई करण्यास मदत होणार असून अन्नसुरक्षा अधिक मजबूत होईल, असा विश्वास अन्न व औषध प्रशासन विभागाने व्यक्त केला आहे.