चाकणमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा हल्ला.! सुमारे 30 नागरिक जखमी... नगरपरिषद प्रशासनची तातडीच्या कठोर उपाययोजना...
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड, चाकण
चाकण शहरात पिसाळलेल्या व भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात जवळपास 30 नागरिक जखमी झाल्याची गंभीर घटना घडली. घटनेची माहिती मिळताच केवळ प्रतिक्रिया न देता प्रत्यक्ष कृतीला प्राधान्य देत नव-नियुक्त नगराध्यक्षा श्रीम. मनिषाताई सुरेशभाऊ गोरे व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य श्री. नितीनभाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ उपाययोजना राबविण्यात आल्या.
चाकण नगरपरिषदेच्या वतीने यापूर्वीच अधिकृत संस्थेमार्फत शहरातील २५० ते ३०० भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व रेबीज प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यात आले होते. त्यामुळे मागील काही महिन्यांत कुत्रा चावा घेण्याच्या घटना घडल्या नव्हत्या. मात्र, शहराबाहेरील भागांतून मोठ्या प्रमाणावर नव्या भटक्या कुत्र्यांचा प्रवेश झाल्याने पुन्हा या आठवड्यात अशा घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही बाब नागरिकांच्या जीवित सुरक्षिततेशी थेट संबंधित असल्याने, मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव, नगराध्यक्षा मनिषाताई गोरे व नितीनभाऊ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद प्रशासनाने युद्धपातळीवर निर्णायक कारवाई सुरू केली आहे.
यामध्ये शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचे पुन्हा सर्वेक्षण, विशेष पकड मोहीम, निर्बीजीकरण व लसीकरण, तसेच नियमानुसार सुरक्षित पुनर्वसन करण्याचे निर्देश देण्यात आले असून, नियुक्त ठेकेदारामार्फत संपूर्ण शहरात व्यापक कारवाई राबविण्यात येत आहे.
दरम्यान, जखमी नागरिकांना तातडीचे उपचार व रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यासाठी नितीनभाऊ गोरे यांनी त्वरित हस्तक्षेप केला. चाकण ग्रामीण रुग्णालयात लस उपलब्ध नसल्याने, जखमी नागरिकांना ॲम्ब्युलन्सद्वारे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पिंपरी येथे पाठवून उपचार व लसीकरणाची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली. तसेच, औंध येथील जिल्हा रुग्णालयातून पाठपुरावा करून आजच चाकण ग्रामीण रुग्णालयात रेबीज लस उपलब्ध करून देण्यात आली.
नागरिकांची सुरक्षा, आरोग्य व शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नगरपरिषद प्रशासन कठोर भूमिकेत व पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाणार आहे.
दरम्यान, चाकण शहरातील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे, तसेच कुठेही पिसाळलेली किंवा आक्रमक कुत्री आढळल्यास तात्काळ खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.
???? संपर्क क्रमांक:
8956128484 | 9594532581 | 7385301341 | 9604877721