अड्याळ येथे 'विशाल हिंदू संमेलन' उत्साहात संपन्न; हिंदू बांधवांचा जनसागर लोटला...
अड्याळ येथील बाजार ग्राऊंडवर 'संघटित हिंदू-समर्थ भारत' या प्रेरणेतून आयोजित करण्यात आलेले 'विशाल हिंदू संमेलन' सोमवारी अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाले. अड्याळसह परिसरातील १० ते १२ गावांतील हजारो हिंदू बांधवांनी या संमेलनाला हजेरी लावून हिंदू एकतेचा जयघोष केला.
दुपारी ३:०० वाजता बाजार ग्राऊंडवरून भव्य भजन व कलश यात्रेला सुरुवात झाली. पारंपारिक वेशभूषेतील महिला आणि डोक्यावर कलश घेतलेल्या माता-भगिनींनी या यात्रेची शोभा वाढवली. गंगा माता मंदिर, बस स्टॉप, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि गुजरी चौक अशा मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत असताना संपूर्ण अड्याळ नगरी 'जय श्रीराम' च्या घोषणांनी दुमदुमून गेली होती.

कार्यक्रमाचे मुख्य वक्ते आणि विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री गोविंद शेंडे यांनी आपल्या प्रखर वाणीतून उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, "हिंदू समाजात एकता आणि बंधुत्व निर्माण होणे हे समर्थ भारतासाठी अनिवार्य आहे." तसेच ह.भ.प. श्री. ओमदेवजी महाराज चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शना मधून संस्कृती रक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
सायंकाळी ४:३० वाजता शास्त्रोक्त पद्धतीने गौमाता पूजन करण्यात आले. सायंकाळी ६:३० वाजता हजारो दीप प्रज्वलित करून भव्य 'भारत माता आरती' करण्यात आली, ज्याने वातावरण भारावून गेले होते. कार्यक्रमाचा समारोप रात्री ७:०० वाजता 'महाप्रसादाने' झाला, ज्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.

या संमेलनासाठी नेरला, नवेगाव, चकारा, सोंडद, सुरबोडी, खापरी, सालेवाडा आणि केसलापुरी या गावांतील ग्रामस्थांनी मोठी उपस्थिती लावली होती. अड्याळमधील सर्व भजन मंडळे, उत्सव मंडळे आणि सामाजिक संघटनांनी या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र परिश्रम घेतले.
आयोजक सकल हिंदू समाज, अड्याळ यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे हे संमेलन इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे.
