मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण - प्रवास होणार अधिक वेगवान...

मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण -  प्रवास होणार अधिक वेगवान...

मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अखेर पूर्णत्वास आला असून, यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे प्रवासाच्या वेळेत सुमारे २० ते ३० मिनिटांची बचत होणार असून, घाट विभागातील वाहतूक कोंडीही लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही अशा महत्वाकांक्षी प्रकल्पांना चालना मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन (एमएसआरडीसी) यांच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे.

या मार्गामुळे प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सिग्नल-फ्री होणार असून, राज्याच्या आर्थिक गतीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प नागरिकांच्या सेवेत दाखल झाल्याने याचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मार्गाची पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या होत्या. समृद्धी महामार्गानंतर आता मिसिंग लिंक प्रकल्पामुळे महाराष्ट्राची ओळख राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक ठळक होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.