महाराष्ट्रात वाहन पासिंग ठप्प.! चालकांचे मोठे नुकसान...
महाराष्ट्रात स्वयंचलित पासिंग केंद्रे अद्याप पूर्णतः कार्यान्वित नसल्यामुळे राज्यातील प्रवासी, टॅक्सी, बस, ट्रक, रिक्षा आदी वाहनांच्या पासिंगचे कामकाज गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
राष्ट्रवादी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष विनोद वरखडे यांनी खासदार पार्थ पवार यांना निवेदन देत हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. वाहन पासिंग हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील Ministry of Road Transport and Highways या खात्याशी संबंधित असल्यामुळे त्वरित निर्णयाची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
पासिंग प्रक्रिया ठप्प झाल्यामुळे हजारो वाहनधारक आणि चालकांना आर्थिक फटका बसत असून, नवीन वाहनांचे रस्त्यावर उतरणेही अडचणीत आले आहे. राज्यभरात पासिंगसाठी थांबलेल्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
मुख्य मागणी काय?
स्वयंचलित पासिंग केंद्रे पूर्णपणे सुरू होईपर्यंत पूर्वीप्रमाणे मॅन्युअल पद्धतीने पासिंग प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
या वेळी मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे, कार्याध्यक्ष अकबर शेख, तसेच सुरज देवकर, अनुदीप येचकर, आप्पा दौंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याशी चर्चा करून ड्रायव्हिंग स्कूलच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच दुबईप्रमाणे कठोर आणि पारदर्शक ड्रायव्हिंग टेस्ट महाराष्ट्रात लागू करण्याचे मत खासदार पार्थ पवार यांनी व्यक्त केले.