"काळ्या" म्हणून हाक दिली आणि; कोयत्याने जीवघेणा हल्ला...
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड पिंपरी चिंचवड,
पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरात किरकोळ कारणावरून थरारक हल्ल्याची घटना घडली आहे. केवळ “काळ्या” अशी हाक मारल्याच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ८ एप्रिल रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता जाधववाडी येथील एका दुकानासमोर घडली. फिर्यादी सूरज सुभाष सूर्यवंशी (वय ३८) हे दुकानाजवळ असताना त्यांना ओळखीचा मंगेश ज्ञानेश्वर मांडोळे (वय २२) दिसला. मजाकीत “काळ्या” अशी हाक मारल्याने आरोपीला संताप आला.
रागाच्या भरात आरोपीने जवळील लोखंडी कोयता काढून फिर्यादीच्या डोक्यात जोरदार वार केला. या हल्ल्यात सूर्यवंशी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मंगेश मांडोळे याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक करत आहेत.