चिखली येथील प्रकार पैशासाठी थेट हल्ला! मैत्रिणीवर दगडाने वार सोनसाखळी लंपास

चिखली येथील प्रकार पैशासाठी थेट हल्ला! मैत्रिणीवर दगडाने वार सोनसाखळी लंपास

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड पिंपरी -चिंचवड,

पिंपरीतील टाळगाव-चिखली परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पैशांच्या वादातून थेट हिंसाचार करत एका तरुणाने स्वतःच्या मैत्रिणीवर दगडाने हल्ला केल्याची घटना उघड झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित युवतीकडे १० हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, तिने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर संतापाच्या भरात आरोपीने तिच्यावर दगडाने जबर मारहाण केली. या हल्ल्यात युवती गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

इतक्यावरच न थांबता, आरोपीने जखमी अवस्थेतील युवतीच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी पिंपरी परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय युवतीने चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी करण विलास महापुरे (वय ३६, रा. टाळगाव चिखली) याला अटक केली आहे.

पोलिसांचा तपास सुरू असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.