उपअधीक्षक गायब, एजंट सक्रिय! खेड भूमी अभिलेख कार्यालयातील कारभार चव्हाट्यावर
प्रतिनिधी :विश्वनाथ केसवड खेड,
खेड येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांच्या कामासाठी गेलेल्या जनसेवकाला अधिकाऱ्यांच्या दालनात जाण्यापासून एका एजंटने मज्जाव केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अधिकारी मोठे की कार्यालयातील एजंट? असा सवाल उपस्थित होत आहे.
जनतेच्या कामासाठी कार्यालयात गेलेल्या जनसेवकाला अधिकाऱ्यांची भेट घेण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, संबंधित व्यक्ती एजंट असल्याचे सांगितले जात असताना त्याची कार्यालयातील वर्तणूक आणि हस्तक्षेप याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक दुपारी १ वाजून गेल्यानंतरही कार्यालयात उपस्थित नसल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी हालचाल रजिस्टरची मागणी करण्यात आली. मात्र, रजिस्टर दाखविण्याबाबत टाळाटाळ करणारी उत्तरे मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.
भूमी अभिलेख कार्यालय हे सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनीशी संबंधित महत्त्वाच्या कामांसाठी अत्यंत संवेदनशील कार्यालय आहे. मोजणी, हद्द निश्चिती, नोंदी आणि इतर कामांसाठी ग्रामीण भागातील नागरिक येथे येत असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबरोबरच कार्यालयातील एजंटांचा हस्तक्षेप असेल तर त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेण्याची गरज आहे, अशी नागरिकांची मागणी आहे.
जनतेच्या कामासाठी आलेल्या नागरिकाला अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी एजंटची परवानगी का लागावी? कार्यालयातील हालचाल रजिस्टर दाखविण्यास टाळाटाळ का झाली? आणि संबंधित उपअधीक्षक कार्यालयात नेमक्या किती वाजता आले? या प्रश्नांची उत्तरे भूमी अभिलेख विभागाने द्यावीत, अशी मागणी होत आहे.
या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून कार्यालयातील एजंटगिरी, अधिकारी-कर्मचारी उपस्थिती आणि नागरिकांच्या तक्रारींबाबत वस्तुनिष्ठ माहिती समोर आणावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
vishwanathkeswad