चाकणमध्ये थारचा थरार! पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न; सिनेमॅटिक पाठलागानंतर सराईत आरोपी जेरबद..

चाकणमध्ये थारचा थरार! पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न; सिनेमॅटिक पाठलागानंतर सराईत आरोपी जेरबद..

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड चाकण,

 चाकण दक्षिण पोलीस ठाणे हद्दीत डायल ११२ कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार निरोज रज्जाक शेख व शत्रुघ्न शिंदे हे सरकारी वाहन क्र. MH-12-RK-5554 मधून मौजे कोयाळी येथे गस्तीवर असताना, पोलीस नियंत्रण कक्षाकडून काळ्या रंगाची ब्लॅक फिल्मिंग केलेली थार गाडी क्र. MH-08-BG-6984 ही मोशी ते चाकण रस्त्याने भरधाव वेगाने जात असून इतर वाहनांना धडक देत असल्याची माहिती मिळाली.

माहिती मिळताच चाकण दक्षिण पोलीस ठाणेकडील उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून आळंदी फाटा ते तळेगाव चौक दरम्यान नाकाबंदी करण्यात आली. सदर थार वाहन आळंदी फाटा येथे दिसून आल्यानंतर पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पोलिसांना हुलकावणी देऊन वाहन भरधाव वेगाने पुढे नेले. मुटकेवाडी चौक येथेही बॅरिकेडिंग करून वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने डिव्हायडरवरून राँग साईडने वाहन नेऊन अनेक वाहनांना धडक देत पळ काढला.

त्यानंतर शेलगाव फाटा येथे नाकाबंदी करण्यात आली असता चालकाने तेथेही वाहन न थांबविता इतर वाहनांना धडक देऊन तसेच नाकाबंदीवरील पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. डायल ११२ पथक व इतर पोलीस पथकाने सदर वाहनाचा पाठलाग सुरू ठेवून सुमारे २ कि.मी. अंतरावर वडगाव घेनंद येथे वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने सरकारी वाहनास जोरदार धडक दिली. त्यानंतर रिव्हर्स घेऊन पोलिसांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पोलीस अंमलदार निरोज शेख यांना दुखापत झाली. दरम्यान, थार वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात अडकल्याने बंद पडले. त्यावेळी पोलिसांनी तात्काळ चालकास ताब्यात घेतले. त्याने आपले नाव सुखदेव हनुमंत नाईक, वय २९ वर्षे, रा. आरग, ता. मिरज, जि. सांगली असे सांगितले. ताब्यात घेतलेल्या आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदर घटनेत १ सरकारी व ४ खाजगी वाहनांचे नुकसान झाले असून १ पोलीस अंमलदार व ४ नागरिक जखमी झाले आहेत. आरोपीविरुद्ध चाकण दक्षिण पोलीस ठाणे गुन्हा र.नं.१८६/२०२६ बीएनएस कलम १०९ (१), २८१,१२५ वगैरे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय सुकाळे करीत आहेत.

रस्त्यावरील नागरिकांच्या तसेच पोलिसांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करणा-या एका अट्टल व सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी प्राणाची पर्वा न करता अत्यंत हिमतीने व धाडसाने ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या धाडसी व सतर्क कामगिरीमुळे नागरिकांच्या मालमत्तेची आणि जीविताची होणारी मोठी हानी टळली असून जनमानसातून पोलिसांचे मनःपूर्वक आभार व समाधान व्यक्त होत आहे.

सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, मा. शशिकांत महावरकर, सह-पोलीस आयुक्त, मा. सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त, मा. बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त व मा. योगेश रांजणकर, सहायक पोलीस आयुक्त, चाकण विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली चाकण दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. सोमनाथ जाधव, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल पाटील, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय सुकाळे, बाबाजी कोतवाल तसेच पोलीस अंमलदार निरोज रज्जाक शेख, शत्रुघ्न शिंदे शिवाजी चव्हाण, सुनील भागवत, रेवन्नाथ खेडकर, आदम शेख, विशाल बंड व सागर कोतवाल यांनी सदर कारवाहीत सहभाग घेतला.