चाकणमध्ये वाहनांचे स्पेअर व्हील चोरणाऱ्या दोघांना नाशिकमधून अटक चाकण उत्तर पोलिसांची कारवाई; ₹60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड चाकण,
चाकण : चाकण गावठाण परिसरातील अगरकर ट्रान्सपोर्टच्या कार्यालयासमोर पार्क केलेल्या वाहनांमधून स्पेअर व्हील चोरी केल्याप्रकरणी चाकण उत्तर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेल्या मालापैकी सुमारे ₹60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दिनांक 4 सप्टेंबर 2026 रोजी रात्री अगरकर ट्रान्सपोर्टच्या कार्यालयासमोर पार्क केलेल्या वाहनांमधून लोखंडी रिम व टायरसह स्पेअर व्हील चोरीला गेले होते. याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांच्या तपास पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. त्यानंतर विवेक अशोक गायकवाड (वय 32, रा. सिडको नगर, नाशिक) आणि राहुल गजानन साळवे (वय 25, रा. रामदास पोलीस चौकीसमोर, सातपूर रोड, नाशिक) यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
आरोपींकडून टाटा 709 मॉडेल वाहनाचे लोखंडी रिम व टायर तसेच टाटा 1212 मॉडेल वाहनाचे लोखंडी रिम व टायर, असा एकूण अंदाजे ₹60 हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे वाहनांमधून स्पेअर व्हील चोरी करणाऱ्या टोळीचा तपास पुढे जाण्याची शक्यता असून, आरोपींकडून या चोरीबाबत अधिक माहिती घेतली जात आहे. गुन्ह्याचा पुढील तपास चाकण उत्तर पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त मारुती जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश रांजणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत आरदवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथक : पोलीस उपनिरीक्षक मोरखंडे, पोलीस अंमलदार शिंदे, कोळेकर, ढमढेरे, लोखंडे, कोळी, जगझाप आणि सांडभोर यांनी कारवाईत सहभाग घेतला.
vishwanathkeswad