चाकण परिसरात अवैध गॅस सिलिंडर भरण्याचा धंदा.! प्रशासनाचे साफ दुर्लक्ष?
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड, चाकण
चाकण परिसरात अवैधरीत्या गॅस सिलिंडरची वाहतूक व रीफिलिंगचा धोकादायक धंदा उघडपणे सुरू असून, या गंभीर प्रकाराकडे महसूल व पोलिस प्रशासन डोळेझाक करत असल्याची तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी बंद गोडाऊन, औद्योगिक शेड व घरांमध्ये घरगुती एलपीजी गॅसचे सिलिंडर बेकायदेशीर पद्धतीने उतरवून रीफिल केले जातात. नंतर हे सिलिंडर रात्रीच्या वेळी बिनधास्तपणे वाहनांमधून हॉटेल, ढाबे व दुकानदारांकडे पोहोचवले जातात. या वाहतुकीदरम्यान कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्याने मोठा स्फोटक धोका निर्माण झाला आहे.
नागरिकांचा प्रश्न आहे की .! ऑनलाईन गॅस बुकिंग प्रक्रिया असतानाही, काही एलपीजी एजन्सीकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर गॅस सिलिंडरची विक्री आणि वाहतूक कशी होते? यामागे एजन्सी व काही अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

वारंवार तक्रारी देऊनही महसूल व पोलिस विभागाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने प्रशासनाची निष्क्रियता उघड झाली आहे. नागरिकांनी या धोकादायक अवैध व्यवसायावर तातडीने मोठी छापा मोहीम राबवून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.