मोठी बातमी : चाकण शहरात दोन अल्पवयीन मुलांकडून एका ३० वर्षीय तरुणाचा खून..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अल्पवयीन मुलांनी दारूच्या नशेत एका ३० वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून त्याच्या डोक्यात दारूची बाटली मारून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलिसाकडून मिळालेल्या माहितीवरून, खून झालेला व्यक्ती अरविंद रामप्रकाश राजे(वय-३० वर्षे), रा. चाकण, गुडलक हॉटेलच्या पाठीमागे भाड्याच्या खोलीत, चाकण -आंबेठाण रोड, चाकण, ता. खेड, जि, पुणे, मूळ रा. मस्तुरा, ता. भितरवाड, जि. ग्वाल्हेर, राज्य मध्यप्रदेशचा मूळ राहणारा असून तो मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. खून झालेल्या तरुणाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून, खून झालेल्या तरुणाने आपल्या पत्नीला स्वतःच्या दुचाकीवरून बुधवारी(दि. ३०) रोजी सकाळी ६ वाजता कामावर सोडले. त्यानंतर त्याची पत्नी दुपारी २ वाजता कामावरून घरी गेली असता. आज आपल्या पतीचा एकही फोन न आल्याने तिने पतीचा चाकण परिसरात शोध घेतला. पती मिळून न आल्याने पत्नीने थेट चाकण पोलीस ठाण्यात जाऊन बेपत्ता पती बाबत विचारपूस करीत असताना त्याच ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन अल्पवयीन मुलांपैकी एका मुलाने खून झालेल्या तरुणाच्या पत्नीला सांगितले की, तुमचे पती आणि आमची तोंड ओळख होती. अल्पवयीन दोन मित्र एकत्र समाधान हॉटेल पाठीमागील थोड्या अंतरावर असलेल्या झाडांच्या सावलीत दुपारी १ वाजताच्या सुमारास नशापान करीत असताना तोंड ओळख असलेला अरविंद राजे हा देखील आमच्या जवळ आला त्याने सुद्धा नशा केली होती. आम्ही तिघांनी पुन्हा तिथे नशापान करीत असताना अरविंद आम्हाला शिवीगाळ करू लागल्याने आमच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतर मारामारीत झाले. दोन अल्पवयीन मुलांनी अरविंदला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एका अल्पवयीन मुलाने जवळच पडलेल्या लाकडाने अरविंद यास बेदम मारहाण केली. तर एका अल्पवयीन मुलाने अरविंदच्या डोक्यात दारूची बाटली मारली. यात अरविंद बेशुद्ध पडल्याने घाबरून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी अरविंदला बेशुद्ध अवस्थेत जवळच्या पिंपळाच्या झाडाजवळील विहिरीजवळ आडोशाला ओढत नेवून टाकले व दोन्ही आरोपी घटनास्थळापासून पसारा झाले.
या घटनेनंतर चाकण पोलिसांना घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी रात्री उशिरापर्यंत पंचनामा करून आरोपीवर खुनाचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड हे करत आहेत.