महाळुंगे वाहतूक विभागाची धडक कारवाई; पाच महिन्यांत लाखोंचा दंड वसूल...
प्रतिनिधी :विश्वनाथ केसवड चाकण,
महाळुंगे वाहतूक विभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती (एमआयडीसी) आणि कंपन्या असल्याने या परिसरात जड-अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. अनेक वाहने रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरपणे पार्क केली जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर महाळुंगे वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवत जानेवारी 2026 ते मे 2026 या कालावधीत रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या जड-अवजड व इतर वाहनांवर कारवाई केली. या मोहिमेत 1,117 प्रकरणे नोंदवून 14 लाख 31 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
तसेच नियमबाह्य व फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या वाहनांवरही कडक कारवाई करण्यात आली. जानेवारी ते मे 2026 दरम्यान 2,037 वाहनांवर कारवाई करून 14 लाख 21 हजार 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला.
पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगे वाहतूक विभागाकडून बुलेट सायलेन्सर, नो-पार्किंग, ब्लॅक फिल्म, फॅन्सी नंबर प्लेट आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई मोहीम सुरू असून, भविष्यातही ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.