News15 मराठी प्रतिंनिधी गणेश मोरे
पुणे : पिंपरी चिंचवड व पुणे महानगरपालिका क्षेत्र सोडून दोनही शहराच्या आजूबाजूला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(PMRDA) च्या हद्दीत मोठ मोठे गृह प्रकल्प उभे राहत आहेत. पण पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(PMRD) क्षेत्रात कोणता गृह प्रकल्प उभा करायचा असेल तर त्यासाठी बिल्डरला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(PMRDA) कडून विविध परवानग्या घेणे बंधनकारक आहे. त्यात प्रामुख्याने वृक्ष तोड, अग्निशमन, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, रस्ते आदीसाठी परवानगी घेणे बंधनकारक असते.
मात्र पुणे शहराच्या लगत असलेल्या वाघोली येथील एक प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(PMRDA)ची कोणतीही परवानगी न घेता शेकडो वृक्षाची कत्तल करून त्यावर मोठं मोठे टॉवर उभे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात अजून विशेष म्हणजे हे प्रकरण बाहेर येण्याची चाहूल लागताच बिल्डरणे नवीन टॉवर बांधणीचे काम सुरु करून मग वृक्ष तोड करण्याची परवानगी मागितल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
याच बांधकाम व्यवसायिकाने विनापरवाना वृक्षतोड केली असल्याची पुराव्यासह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(PMRDA) चे मुख्य महानगर नियोजनकार यांना मागील एक महिन्यापूर्वी कल्पना देऊनही त्या बांधकाम व्यवसायिकावर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. यावरून विनापरवानगी वृक्ष तोड करणारा व्यावसायिक आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(PMRDA) अधिकारी यांच्यात काही आर्थिक हितसंबंध तर नाही ना? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जर असे विनापरवाना वृक्ष तोड करणारे बांधकाम व्यावसायिक यांना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) अधिकारी संरक्षण देत असतील तर त्या अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांच्या कडून होत आहे. या विषयी आम्ही पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(PMRDA) अधिकारी यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आम्ही माहिती घेतोय, त्याचा अहवाल करतोय, तो वरिष्ठाच्याकडे पाठवतोय असेच काहीसे कागदी घोडे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(PMRDA) चे अधिकारी नाचवताना दिसत आहेत.