निसर्गमय डोंगरावर असलेली न्याहरी माता
![निसर्गमय डोंगरावर असलेली न्याहरी माता](https://news15marathi.com/uploads/images/202410/image_750x_6707d76354b9b.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
जगातील प्रत्येक धर्मानुसार पृथ्वीवरील विशिष्ट स्थाने पवित्र मानली जातात.या पवित्र स्थानांनाच तीर्थक्षेत्र,पर्यटनक्षेत्र,धार्मिक स्थळे म्हटले जाते.अशाच प्रकारे तीर्थक्षेत्र म्हणजे दिंडोरी जि.नाशिक परिसरात असलेली न्याहारी माता देवस्थान. दिंडोरी शहराच्या दक्षिणेस डोंगरावर वास्तव्यास असलेल्या भवानी मातेमुळे या डोंगराला भवानीचा डोंगर पण म्हटले जाते.खूपच निसर्गरम्य आणि सोप्या चढाईचा डोंगर आणि शहरालगत असल्याकारणाने डोंगरावर नेहमी सकाळपासून भाविकांची नेहमीच गर्दी असते. विशेष करून मंगळवार,शुक्रवार आणि रविवार या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ बघायला मिळते पावसाळ्यात आजूबाजूचा प्रदेश हिरवळीने आणि वनराईने नटलेल्यामुळे पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षण या परिसराचे होते. छोटे मोठे धबधबे विविध रंगाची फुले आणि त्याचबरोबर धार्मिक असता यांचा संगम पावसाळ्यात नेहमीच बघायला मिळतो.अशा या न्याहारी मातेची परिसरात एक आख्यायिका रूढ असून आजूबाजूची जाणकार मंडळी यावर नेहमीच चर्चा करताना आढळतात.देवीच्या अवतार निर्मितीचा सरळ संबंध सोळाव्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराजांची निगडित मानला जातो. न्याहरी माता हे नाव पण त्याच संदर्भाशी जोडलेल आहे.१६७० च्या सुरत लुटीच्या वेळेस छत्रपती शिवराय व मोरोपंत पिंगळे मावळ्यांसह दिंडोरी मार्गाने प्रवास करत असताना,थोडा वेळ विश्रांती व जेवणासाठी ह्या डोंगर माथ्यावर थांबले,डोंगर पायथ्याला चुलीच्या आकाराची दरी असून तेथे बारमाही पाण्याची झरे आहेत त्याच ठिकाणी घोड्यांना व बरोबर असणाऱ्यांना पाणी पिण्यास मिळाले व त्याच ठिकाणी बरोबर असणाऱ्या तलवारी भाले यांना दगडावर घासून धार लावण्यात आली.हत्यारांना धार लावताना दगडांना पडलेले चर आजही तेथे आपल्याला बघायला मिळतात.सैनिकांसह विश्रांती करून जेवण करत असताना महाराजांना मुघल सैन्य आपल्या पाटलागावर असल्याची चाहूल लागली होती. अचानक आलेल्या संकटामुळे महाराजांनी भवानी देवीचा आराधना केली भवानी मातेने महाराजांना प्रसन्न होऊन विजयाचा आशीर्वाद दिला. डोंगराच्या पश्चिम बाजूस आजही आपल्याला शौर्यभूमी रणतळे म्हणून ठिकाण आहे. तेथे शिवाजी महाराज व मुघल यांच्यात घनघोर लढाई झाली त्यात महाराजांना जय मिळाला. आख्यायिकेनुसार ज्या डोंगरावर महाराजांना भवानी मातेचा वरदहस्त लाभला व ज्या डोंगरावर महाराजांनी जेवन म्हणजे न्याहारी केली,तोच डोंगर नंतरच्या काळात न्याहरीचा डोंगर म्हणून प्रसिद्धीस आला. डोंगरावर पूर्व बाजूंनी अग्नियेमूखी भवानी मातेची मूर्ती असून ती कठीण पाषाणाची आहे.सुरुवातीच्या काळात छोटे खाणी मंदिर होते.परिसरातील भाविक देवी वरती श्रद्धा ठेवून मोठ्या प्रमाणात नवस बोलतात.जसजसे भाविकांना देवीचा आशीर्वाद मिळत केला तसतसे परिसरातील नागरिकांची श्रद्धा वाढत गेली. त्यातूनच आज भव्य मंदिर सभा मंडपासह पायरी मार्ग तयार करण्यात आला आहे.नवीन पद्धतीचे सिमेंट काँक्रीटचे सुरेख असे मंदिर आज आपल्या सर्वांना पहायला मिळते. भाऊसाहेब कदम यांनी येथे बारमाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे.या मंदिराची व्यवस्था व पूजा विधीचा मान जुन्या काळापासून अक्राळे गावच्या उदार घराण्याकडे आहे.तुळजापूरच्या भवानीचा अंश मानून परिसरातील नागरिक देवीची खण नारळाने ओटी भरण,घटी बसणे, देवीचा गोंधळ,बोकड बळी अशा प्रथांनी पूजा विधी करत असतात.चैत्र पौर्णिमा,नवरात्र यावेळेस मंदिरात मोठे उत्सव साजरे केले जातात.डोंगर परिसरात पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणात वनसंपदा होती पण आज वृक्षसंपदा कमी झाली आहे,त्याचं कारण म्हणजे जंगलतोड,मानवी किंवा नैसर्गिक रित्या लागणारी वनवे.
या वनसंपदेला पुनर वैभव प्राप्त व्हावे म्हणून कोराटे येथील भाऊसाहेब चव्हाणके व त्यांचे पंचक्रोशीतील सहकारी गेल्या सहा सात वर्षापासून वृक्षारोपण व वृक्ष संगोपनाचे कार्य करत आहे.हा परिसर वन विभागाच्या अंतर्गत येत असल्याने वन विभागाची करडी नजर असते.वन कायद्यानुसार शिखरबंदी तसेच वृक्षतोड यासाठी वन विभाग मोठ्या प्रमाणात दक्षता घेत आहे.