डिग्रसवाणी शेतशिवारात शेतकऱ्यांवर रानडुकराचा जीवघेणा हल्ला.! शेतकरी गंभीर...
![डिग्रसवाणी शेतशिवारात शेतकऱ्यांवर रानडुकराचा जीवघेणा हल्ला.! शेतकरी गंभीर...](https://news15marathi.com/uploads/images/202501/image_750x_678c8c64a85aa.jpg)
प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील डिग्रसवाणी शिवारामध्ये शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्यावर दि.18 जानेवारीच्या सायंकाळी 9:30 च्या सुमारास रानडुकराने हल्ला करून शरीराचे अक्षरशः लचके तोडून, सुमारे आठ ते दहा ठिकाणी चावा घेत गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
हल्ल्यानंतर जखमी शेतकऱ्यास तातडीने उपचारासाठी हिंगोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा शेतकऱ्यावर शस्त्रक्रिया सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार; हिंगोली तालुक्यातील संतोष आढळकर यांचे डिग्रसवाणी शिवारात शेत आहे. नेहमीप्रमाणे आढळकर शेतात दिवसभर काम करून सायंकाळी घरी निघण्याच्या तयारीत होते. यावेळी एका रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढवला. आढळकर यांना उपचारासाठी तातडीने हिंगोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमध्ये आढळकर यांचा एक हात पूर्णपणे निकामी झाला. या घटनेची माहिती मिळताच कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी रुग्णालयात येऊन संतोष आढळकर यांची तब्येतीची चौकशी केली आहे व कुटुंबियांना धीर देत सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले.