खा. अशोक चव्हाण यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट.! जि.प. इमारतीसाठी 350 कोटींच्या मागणीसह अनेक विकासकामांकडे वेधले लक्ष...
![खा. अशोक चव्हाण यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट.! जि.प. इमारतीसाठी 350 कोटींच्या मागणीसह अनेक विकासकामांकडे वेधले लक्ष...](https://news15marathi.com/uploads/images/202502/image_750x_67a197940ed3f.jpg)
प्रतिनिधी - अनंतोजी कालिदास, नांदेड
भाजप संघटन वाढीसह भोकर मतदारसंघ व जिल्ह्यातील विकासाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत यासाठी खा. अशोकराव चव्हाण ‘अॅक्शन मोड’वर आहेत. सोमवारी त्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत जिल्हा परिषद इमारतीसाठी 350 कोटी रुपयांची मागणी करून इतर अनेक विकासकामांकडे त्यांचे लक्ष वेधले.
विधानसभा निवडणुकीनंतर माजी मुख्यमंत्री खा अशोकराव चव्हाण यांनी जिल्ह्याच्या विकासाला फोकस केले आहे. त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जिल्हा परिषद इमारतीसह इतर काही विकासकामांसाठी 350 कोटी रुपयांची मागणी केली आहे. येथील जिल्हा परिषद इमारत व संलग्न बांधकामे 1980 च्या दशकात झाले असून, बहुतांश इमारती जीर्ण व धोकादायक स्वरुपाच्या झाल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद मुख्य प्रशासकीय इमारत व संलग्न बांधकामांसाठी 350 कोटी निधी मंजूर करावा. महावितरणच्या स्थायी धोरणानुसार प्रत्येक तालुक्याला 132/33 के. व्ही. उपकेंद्र असणे आवश्यक आहे. मात्र मुदखेड तालुक्यात 132 के.व्ही. उपकेंद्र नाही. सद्यस्थितीत सिंधी, मुदखेड, माळकौठा व निवघा येथे 33 के.व्ही.उपकेंद्र असून, 25 एम.डब्ल्लू भार, उमरी येथून निघालेल्या 132 के. व्ही. या एकाच वाहिनीवर असल्याने या वाहिनीवर वारंवार बिघाड होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असल्याने 132 के.व्ही उपकेंद्र उभारावे,भोकर मतदारसंघातील जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत मौ.कोंडदेवनगर, मौ. बटाळा आणि मौ. मोखंडी गावांना
आराखड्यात समाविष्ट करून कामे मंजूर करावीत, मौ. कोंडदेवनगर, ता. भोकर येथे पुलवजा को.प.बंधारे आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण. मौ.बटाळा, ता. भोकर येथे साखळी सिमेंट नाला बंधारे आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण.,मोखंडी, ता. भोकर येथे पुलवजा को.प.ब आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण आदी कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी अशोकराव चव्हाण यांनी केली.
भोकर विधानसभा मतदारसंघातील जलसंधारण महामंडळ योजनेअंतर्गत 2 साठवण तलाव, 11 को. प. बंधारे व 17 द्वारयुक्त सि. ना. बंधारे अशा एकूण 30 कामांकरिता 74.54 कोटी एवढ्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. उपरोक्त योजनेकरीता अद्यापपर्यंत 04.39 कोटी इतका निधी प्राप्त झालेला आहे. जलसंधारण महामंडळ योजनेअंतर्गत निधी उपलब्ध होत नसल्यामुळे कामाची प्रगती मंदावलेली आहे. तरी सदर कामांकरिता 70.15 कोटी इतका निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी खा. अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. भोकर मतदारसंघातील इतर काही विकासकामांबाबत आ. श्रीजया चव्हाण यांचा पाठपुरावा सुरु असून, त्यासंदर्भातही खा. चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.