कुरुळीत जीवाशी खेळ? बेकायदेशीर गॅस रिफिलिंग रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश...

कुरुळीत जीवाशी खेळ? बेकायदेशीर गॅस रिफिलिंग रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश...

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड चाकण,

कुरुळी (ता. खेड) : परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून बेकायदेशीररित्या गॅस काढून लहान टाक्यांमध्ये भरून मानवी जीविताला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

बुधवार (११ फेब्रुवारी) रोजी दुपारी ३:३५ वाजण्याच्या सुमारास गायकवाड वस्ती येथे ही धडक कारवाई करण्यात आली. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल किरण जाधव यांच्या फिर्यादीवरून गणेश संतोष कुंभार (२४) व उद्धव गोसावी (३६) (दोघेही चाकण येथील रहिवासी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, कोणतीही सुरक्षा उपाययोजना न पाळता केवळ आर्थिक फायद्यासाठी हा अत्यंत धोकादायक प्रकार सुरू होता. घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस छोट्या टाक्यांमध्ये भरताना स्फोट किंवा आगीचा मोठा धोका संभवतो, त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला होता.

पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल ४५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास महाळुंगे पोलीस ठाणे करत आहेत.

या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अशा बेकायदेशीर प्रकारांवर पोलिसांची करडी नजर असल्याचा इशारा देण्यात आला आहे.