“मंगेश साबळेंची तडीपारी रद्द करा!” चांडोली फाट्यावर आपचा एल्गार; प्रशासनाला आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड खेड,
राजगुरूनगर : शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते मंगेश साबळे यांच्यावर करण्यात आलेली दोन जिल्ह्यांतील तडीपारीची कारवाई तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने चांडोली फाटा येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. आपचे खेड तालुकाध्यक्ष स्वप्निल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी प्रशासनाच्या कथित दडपशाहीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मंगेश साबळे यांच्यावर राजकीय दबावातून आणि सूडबुद्धीने तडीपारीची कारवाई करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणे गुन्हा असेल तर आम्हाला फाशी द्या
आंदोलनादरम्यान आपचे खेड तालुकाध्यक्ष स्वप्निल गायकवाड यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या, दुष्काळ आणि पीकविम्याच्या अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून तडीपार केले जात आहे. शेतकरी आणि गोरगरिबांसाठी आवाज उठवणे हा जर प्रशासनाच्या नजरेत गुन्हा असेल, तर आम्हाला थेट फाशीची शिक्षा द्या. मात्र, अशा अन्यायाविरुद्ध आम्ही मागे हटणार नाही.
आंदोलनातील प्रमुख मागण्या
- मंगेश साबळे यांच्यावरील दोन जिल्ह्यांतील तडीपारीची कारवाई तात्काळ व विनाअट रद्द करावी.
- शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले कथित खोटे गुन्हे मागे घ्यावेत.
- लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील दडपशाही थांबवावी.
शासनाने या मागण्यांची दखल घेतली नाही आणि मंगेश साबळे यांची तडीपारी मागे घेतली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दिला.
या आंदोलनात आम आदमी पार्टीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
vishwanathkeswad