गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरणारा आरोपी शिरूर पोलिसांच्या जाळ्यात; डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई
News 15 मराठी प्रतिनिधी | विश्वनाथ केसवड
शिरूर : गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बेकायदेशीररीत्या जवळ बाळगणाऱ्या एका संशयित आरोपीला शिरूर पोलिसांनी अटक केली आहे. शिरूर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि. २७ नोव्हेंबर २०२६) रोजी रात्री सुमारे १०:५० वाजण्याच्या सुमारास शिरूर शहरात पोलीस पथक गस्त घालत होते. यावेळी पोलीस अंमलदार बाळाजी मोटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिरूर शहरातील रेणुकामाता मंदिर परिसरातील खाली मोकळ्या जागेत एक इसम गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बेकायदेशीररीत्या जवळ बाळगून थांबला आहे.
या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या परवानगीने पोलीस पथक आणि पंचांसह संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी संशयित इसम पोलिसांच्या हाती लागला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.
पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. आरोपीचे नाव गणेश राम गव्हाणे (वय ३३, व्यवसाय चालक, रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग, पोलीस अंमलदार नितेश थोरात, बाळाजी मोटे, संदीप खेडकर, राहुल वाघमोडे, विजय शिंदे, अर्जुन भालसिंग, अजय पाटील आणि अंबादास थोरात यांनी सहभाग घेतला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग करीत आहेत.
vishwanathkeswad