खेडमध्ये पोलिसांच्या अडचणी वाढल्या! मारहाण प्रकरणात सहा पोलिसांसह आठ जणांविरोधात न्यायालयाचे प्रक्रिया जारी करण्याचे आदेश
खेड | प्रतिनिधी विश्वनाथ केसवड,
खेड तालुक्यातील संतोषनगर येथे जमीन मोजणीदरम्यान मारहाण झाल्याच्या आरोपावरून दाखल तक्रारीत खेड-राजगुरुनगर न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. या प्रकरणात सहा पोलिस अधिकारी आणि अन्य दोन जणांविरोधात फौजदारी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने १७ ऑक्टोबर २०२६ रोजी दिले आहेत. या आदेशामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
न्यायालयात दाखल तक्रारीनुसार, १८ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास संतोषनगर, खेड येथील गट क्रमांक २०५ मधील शेतजमिनीची मोजणी सुरू असताना संबंधित पोलिस अधिकारी आणि इतर व्यक्तींनी तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तींनी एका अन्य व्यक्तीच्या फायद्यासाठी पोलिस पदाचा गैरवापर केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात तक्रारदाराने न्यायालयासमोर कागदपत्रे, साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय प्रमाणपत्रे तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि स्क्रीनशॉट सादर केले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल नकारात्मक होता. मात्र, हा अहवाल न्यायालयावर बंधनकारक नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांचे स्वतंत्रपणे परीक्षण केले.
विशेष म्हणजे, तक्रारदाराकडून सादर करण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज, स्क्रीनशॉट आणि संबंधित प्रमाणपत्रांचाही न्यायालयाने विचार केला. तक्रारीतील आरोप आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे संबंधितांविरोधात पुढील न्यायालयीन प्रक्रिया राबविण्यास प्रथमदर्शनी पुरेसा आधार असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
नेमका काय दिला न्यायालयाने आदेश?
न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग ए. ए. जोशी यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३, ३२४, ३२५, ३२६, ४२७, ४४१, ५०४, ५०६ सह ३४ अंतर्गत आरोपी क्रमांक १ ते ६ आणि ८ यांच्याविरोधात प्रक्रिया जारी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रकरण नियमित फौजदारी खटला म्हणून नोंदवून संबंधित न्यायालयाकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले आहेत.
आता पुढे काय होणार?
पोलिस अधिकारी आणि इतर व्यक्तींविरोधात न्यायालयाने प्रक्रिया जारी केल्याने या प्रकरणातील पुढील न्यायालयीन घडामोडींकडे लक्ष लागले आहे. मात्र, न्यायालयाचा हा आदेश म्हणजे संबंधित आरोपी दोषी ठरल्याचा अंतिम निकाल नसून, त्यांच्याविरोधात पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश आहे.
vishwanathkeswad