मोका गुन्ह्यातील आरोपी पिस्टलसह जेरबंद; खंडणीविरोधी पथकाची धडक कारवाई पाच महिन्यांपासून पोलिसांना देत होता चकवा
प्रतिनिधी: विश्वनाथ केसवड पिंपरी -चिंचवड
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गणेशोत्सवाचा सण सुरक्षित, आनंदी आणि शांततेत पार पडावा, तसेच अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याच्या पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार खंडणीविरोधी पथकाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत मोका (MCOCA) अंतर्गत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात मागील पाच महिन्यांपासून पाहिजे असलेल्या आरोपीला अवैध पिस्टल व जिवंत काडतुसांसह ताब्यात घेण्यात आले.
राहुल रमेश चव्हाण (वय २६, रा. भारतमातानगर, दिघी, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
खंडणीविरोधी पथकाचे पोलीस हवालदार प्रदीप पोटे यांना राहुल चव्हाण याच्याकडे अवैध शस्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी पठारे मळा, ९० फुटी रोड, म्हसोबा देवस्थानासमोरील मोकळ्या जागेत, चऱ्होली बु. परिसरात सापळा रचून राहुल चव्हाण याला ताब्यात घेतले.
आरोपीची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून ₹५३ हजार रुपये किमतीचे एक लोखंडी पिस्टल, दोन लोखंडी मॅग्झिन्स आणि दोन जिवंत राऊंड (काडतुसे) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६०७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३(५), भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच महिन्यांपासून पोलिसांना देत होता चकवा
राहुल चव्हाण हा दिघी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक २१५/२०२६ मधील गंभीर गुन्ह्यात मागील पाच महिन्यांपासून पाहिजे होता. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह भारतीय हत्यार अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, क्रिमिनल अॅमेडमेंट अॅक्ट आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कलमे लावण्यात आली आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, मागील पाच महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत असलेल्या या आरोपीला अखेर अवैध शस्त्रासह ताब्यात घेण्यात खंडणीविरोधी पथकाला यश आले.
आरोपीची वैद्यकीय तपासणी वायसीएम रुग्णालय, पिंपरी येथे करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी त्याला दिघी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, पोलीस हवालदार प्रदीप पोटे, किरण जाधव, चंद्रकांत जाधव आणि संदीप गंगावणे यांच्या पथकाने केली.
vishwanathkeswad