अड्याळ मध्ये चैत्र नवरात्रोत्सवाची सांगता; ९०० ज्योती कलशांचे भक्तिमय वातावरणात विसर्जन...
प्रतिनिधी - नितीन वरगंटीवार भंडारा
अड्याळ (भंडारा) येथील हनुमान मंदिर मध्ये चैत्र नवरात्र आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रज्वलित करण्यात आलेल्या मनोकामना ज्योती कलशांचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. पवनी तालुक्यातील अड्याळ येथे गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या या शक्तीच्या उपासनेची सांगता ३०० वर्षे पुरातन असलेल्या चकारा येथील शिव मंदिर परिसरातील तलावात ज्योती विसर्जन करण्यात आले .
अड्याळ परिसरात नवरात्रोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावर्षी एकूण ९०० ज्योती कलशांची स्थापना करण्यात आली होती. नऊ दिवस अखंड तेवत असलेल्या या ज्योतींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. चकारा येथील ऐतिहासिक शिव मंदिर, ज्याला ३०० वर्षांचा प्राचीन वारसा लाभलेला आहे, त्या मंदिराच्या शेजारील विस्तीर्ण तलावामध्ये हे ज्योतीकलश विसर्जित करण्यात आले
विसर्जनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. 'आई जगदंबे उदो उदो' च्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण अड्याळ नगरी दुमदुमून गेली होती. महिलांनी मोठ्या संख्येने डोक्यावर कलश घेऊन या सोहळ्यात सहभाग नोंदवला.
विशाल जनसमुदाय लक्षात घेता, विसर्जन स्थळी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त आणि स्थानिक स्वयंसेवकांची मदत घेण्यात आली होती. अत्यंत शिस्तबद्ध आणि मंगलमयी वातावरणात हा सोहळा पार पडला.
